विश्वचषकातील लीग लढतीत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. सुरुवातीलाच एक गडी बाद झाला तरी इशान किशनने डाव सावरला. त्यानंतर गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानचा डाव गुंडाळला आणि भारताने ६१ धावांनी शानदार विजय मिळवला. या यशासह टीम इंडिया सुपर ८ मध्ये पोहोचली आहे.
पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. आघाडीचे तीन फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला. उस्मान खानने ४४ धावा करत झुंज दिली, पण त्याला पुरेशी साथ मिळाली नाही.
भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा केला. बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनीही मोलाची साथ दिली. एकूणच, सर्वांगिण कामगिरीच्या जोरावर भारताने कट्टर प्रतिस्पर्ध्याला नमवले.