देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात 28 ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफीने होणार आहे. या आधीच भारतीय क्रिकेटमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कसोटीपटू हनुमा विहारी आता आंध्रऐवजी दुसऱ्या संघाकडून खेळण्याच्या तयारीत आहे.
विहारीने आंध्र क्रिकेट असोसिएशनकडे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) मागितलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, तो येत्या हंगामात त्रिपुराकडून खेळण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे, तर त्याला संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली जाऊ शकते. यामुळे देशांतर्गत क्रिकेट हंगाम अधिक रंगतदार होणार आहे.
माध्यमांशी बोलताना विहारी म्हणाला, “मी बदलाबाबत विचार करत आहे. त्रिपुराकडून मला खेळण्यासाठी आमंत्रण मिळालं आहे आणि त्यासाठी मी एनओसीसाठी अर्ज केला आहे.” हनुमा विहारीचा देशांतर्गत अनुभव मोठा आहे. त्याने 131 फर्स्ट क्लास आणि 97 लिस्ट ए सामने खेळले आहेत.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 24 शतकं आणि 51 अर्धशतकं आहेत. तो सध्या 10 हजार धावांच्या टप्प्याजवळ असून आत्तापर्यंत 9,585 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर विहारीने भारताकडून 16 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 839 धावा केल्या असून गोलंदाजीमध्ये 5 बळी मिळवले आहेत. हनुमा विहारीचा हा निर्णय त्याच्या करिअरला नवं वळण देणारा ठरू शकतो.