आशिया कप 2025 स्पर्धेतील आज महत्त्वाचा सामना रंगणार आहे. आज भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच अनेक राजकीय नेत्यांकडून आणि आता चाहत्यांकडून या सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. मात्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, आपल्याला बहु-संघीय स्पर्धेत खेळावे लागेल. त्यामुळे हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र सोशल मीडियावर या सामन्याला धरुन होणाऱ्या ट्रोलींला पाहता टीम इंडियाचे खेळाडू चिंतेत पडले आहेत.
यादरम्यान टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये तणाव निर्माण झाला असून कर्णधार सूर्यकुमार यादव, उपकर्णधार शुभमन गिलसह अनेक खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरशीही याबद्दल चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय खेळाडूंना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केल जात आहे. ज्यामुळे त्यांना त्याचा त्रास होत आहे, तसेच यामुळे खेळाकडे लक्षकेंद्रीत करण त्यांच्यासाठी कठीण होत आहे.
त्यामुळे खेळाडूंना शांत करण्यासाठी आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी भारतीय खेळाडूंनी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायवेटेड सामना हा आशिया कप 2025 चा सहावा सामना आहे.
हा गट 'अ' मधील सामना आहे. भारताने युएईचा पराभव केला आणि पाकिस्तानने ओमानचा पराभव केला. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. अशातच आज दोन्ही एकमेकांसमोर येणार आहेत. मात्र सामन्यापूर्वीच सुरु असलेल्या बहिष्कारामुळे या सामन्यात काय होणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.