सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यादरम्यान दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यात वादाची ठिणगी पेटली. हा वाद इतका पेटला की यात अंपायरसह ऋषभपंतनेही मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं. दिग्वेश राठीने अभिषेकची विकेट घेतल्यानंतर नोटबुक सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन वेगळ्याच वळणाला गेलेलं पाहायला मिळालं. दिग्वेश राठी आणि अभिषेकमध्ये झालेल्या वादाचा दोघांना ही दणका बसला आहे.
दिग्वेश राठीवर बीसीसीआयने कडक कारवाई केली आहे. याआधी देखील दोन वेळा त्याच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. LSG VS SRH या सामन्यादरम्यान अभिषेक सोबत दिग्वेशने जो वाद घातला त्यामुळे त्याला गुजरातविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. एवढचं नाही तर त्याला सामना शुल्काच्या 50 टक्के दंड देखील ठोठावण्यात आला आहे. त्याचसोबत दिग्वेशला 2 डिमेरिट पॉईंट देण्यात आले आहेत. याआधी देखील पंजाब आणि मुंबई विरुद्धच्या सामन्यात दिग्वेशला 3 डिमेरिट पॉईंट देण्यात आले होते. त्यामुळे आताचे 2 आणि आधीचे 3 असे मिळून दिग्वेशला 5 डिमेरिट पॉईंट मिळाले आहेत. यावेळी बीसीसीआयने अभिषेक शर्माला देखील 25 टक्के दंड ठोठावत दणका दिला आहे.
याचपार्श्वभूमीवर लखनऊ संघाचा कर्णधार रिषभ पंत याने संघाच्या अपयशावर आणि दिग्वेश राठीच्या कामगिरीबाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. यावेळी तो म्हणाला की, " यंदाचा हंगाम आमच्यासाठी उत्तम ठरू शकला असता, हंगामाच्या सुरुवातीला आम्ही चांगला खेळ केला आणि काही सामने जिंकले. पण आमचा प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे आम्हाला मोठा फटका बसला". तसेच पुढे दिग्वेश राठीबाबत बोलताना पंत म्हणाला की,"दिग्वेशने पहिल्याच हंगामात आपली उत्तम कामगिरी दाखवली. मात्र क्रिकेटमध्ये सातत्याने सुधारणा आवश्यक आहे. त्याने यावर लक्ष दिले पाहिजे, आणि पुढील हंगामात अधिक चांगली कामगिरी केली पाहिजे.