इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या समारोप समारंभात भारतीय सशस्त्र दलांना विशेष श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या या समारंभात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अभियानाची दखल घेत देशाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या वीर जवानांचा गौरव करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ने हा निर्णय नुकताच घेतला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम 7 मे रोजी सुरु झाली होती. या कारवाईत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) भागात असलेल्या अनेक दहशतवादी तळांवर हल्ले करत त्यांना उद्ध्वस्त केले. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या संघटनांशी संबंधित दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले होते. ही मोहीम एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आली होती, ज्यात 26 निष्पाप नागरिकांचे प्राण गेले होते.
या कारवाईच्या यशानंतर BCCI ने IPL च्या क्लोजिंग सेरेमनीला देशभक्तीचा स्पर्श देण्याचे ठरवले. क्रिकेटच्या माध्यमातून देशवासीयांपर्यंत सशस्त्र दलांचे योगदान पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या समारंभात लष्कर, नौदल आणि वायुदल प्रमुखांसह चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, “सशस्त्र दलांचे शौर्य आणि निःस्वार्थ सेवा देशासाठी प्रेरणादायक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामागे असलेल्या धैर्याला सलाम म्हणून आम्ही हा समारंभ त्यांना समर्पित करत आहोत.” दरम्यान, भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावामुळे IPL ला आठवड्याचा थांबा घेण्यास भाग पाडले गेले होते. परिणामी, 25 मेला होणारा अंतिम सामना आता ३ जून रोजी आयोजित केला जाणार आहे. प्लेऑफ सामने 29 मेपासून सुरू होतील आणि मुल्लांपूर येथे क्वालिफायर व एलिमिनेटर सामने खेळवले जातील.