आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अलीकडेच पुरुष क्रिकेटसाठी काही महत्त्वाचे नियम बदल स्वीकारले असून, त्यांचा प्रभाव 2025-27 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सत्रात दिसून येत आहे. मात्र, आता 2 जुलैपासून हे नियम अधिक औपचारिकरीत्या कसोटी क्रिकेटमध्ये लागू होणार आहेत. भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपासून हे बदल अमलात येतील.
स्लो ओव्हर रेटवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘स्टॉप क्लॉक’ नियम कसोटीतही अमलात आणण्यात येणार आहे. एका षटकानंतर पुढील षटक सुरू होण्यासाठी संघाला फक्त 60 सेकंद मिळतील. जर संघ वेळेत तयार झाला नाही, तर पंच दोन वेळा ताकीद देतील. त्यानंतर पाच धावांची दंडात्मक कारवाई केली जाईल.
आता फलंदाज DRS घेतल्यावर झेल बाद असल्याचा निर्णय टीव्ही अंपायर रद्द करत असला, तरी त्यानंतर लगेचच LBWसाठीही पुनर्पडताळणी करता येईल. पूर्वी यावेळी नॉट आऊटचा डिफॉल्ट निर्णय कायम राहायचा, मात्र आता तशी अट राहणार नाही. या नव्या नियमांमुळे कसोटी क्रिकेट आणखी शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे, असे संकेत ICCने दिले आहेत.
इतर महत्त्वाचे बदल
चेंडूवर जाणूनबुजून लाळ लावल्यास चेंडू बदलण्याची सक्ती नाही.
जर झेल अस्पष्ट असेल आणि क्षेत्ररक्षक जाणीवपूर्वक बादचा दावा करतो, तर त्या चेंडूला नो-बॉल ठरवले जाईल.
फलंदाज शॉर्ट रन घेताना मुद्दाम फसवणूक करत असल्याचे आढळल्यास पाच धावांचा दंड करण्यात येईल.
काही प्रसंगी पंच क्षेत्ररक्षक संघाला विचारतील की त्यांना स्ट्राईकवर कोणता फलंदाज हवा आहे.