भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स मधील हेडिंग्ले मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक नवीन वाद समोर आला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारतीय खेळाडूंनी पंच क्रिस गॅफनी यांना अनेक वेळा चेंडू बदलण्याबाबत विचारणा केली. मात्र प्रत्येक वेळी पंचांनी त्यांची मागणी नाकारली. त्यामुळे उपकर्णधार ऋषभ पंत याने याबाबत आपला राग व्यक्त करत चेंडू मैदानावर फेकला, याच पार्श्वभूमीवर पंचांच्या निर्णयावर विरोध दर्शवल्यामुळे आता ऋषभ पंत याच्या खेळावर बंदी किंवा त्याला त्याबाबत दंड ठोठावला जाऊ शकतो.
भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ला 20 जूनपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेने झाली आहे. यामध्ये कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 61 व्या षटकात मोहम्मद सिराज हॅरी ब्रूकविरुद्ध गोलंदाजी करत असताना त्याने पंचांना चेंडू बदलण्याची मागणी केली. मात्र पंच क्रिस गॅफनी यांनी ती मागणी फेटाळली. यावेळी ऋषभ पंत हा सर्व घटनाक्रम पाहत होते. त्यांना हा प्रकार आवडला नाही.
दरम्यान भारतीय खेळाडूंनी याआधीही अनेकवेळा चेंडू बदलण्याबाबत विचारणा केली होती मात्र पंचांनी वेळोवेळी त्यांची मागणी फेटाळली. त्यामुळे उपकर्णधार ऋषभ पंत याने पुन्हा स्वतः जाऊन चेंडू बदलण्याबाबत विचारणा केली मात्र तेव्हा सुद्धा त्या पंचांनी नकार दर्शवला. त्यामुळे संतापलेल्या ऋषभ पंतने पंचांकडे रागाने पाहत चेंडू मैदानात रागाने फेकला. मात्र ऋषभ पंतच्या या कृतीमुळे आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऋषभ पंतचा हा राग म्हणजे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा प्रकार वाटू शकतो.
कलम 2.8 नुसार, जर क्रिकेटमध्ये पंचांच्या निर्णयाविरुद्ध एखाद्या क्रिकेटरने आपली नाराजी दर्शवली किंवा असहमती दर्शवली तर अश्या परिस्थितीमध्ये त्या संबंधित खेळाडूला नियमानुसार त्याच्या खेळावर बंदी किंवा त्यांच्यावर दंड ठोठावला जाऊ शकतो. कर्णधार शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनीही याआधी चेंडू स्विंग होत नाही. त्याचा आकार बदलला आहे हे कारण देत चेंडू बदलण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर त्यांना पंचांकडून नकार आला होता. मात्र ऋषभ पंत याने पंचांच्या या निर्णयावर नाराजी दर्शवल्याने आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.