आशिया कप 2025 स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यापासून पाकिस्तान संघ चर्चेत आला आहे. आधी टीम इंडियाने हस्तांदोलन न केल्यामुळे, त्यानंतर युएई विरुद्ध सामन्यात रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना मॅच पॅनेलमधून काढण्याच्या मागणीवरुन, अशा काही करामतींमुळे पाकिस्तान संघ आशिया कप 2025 स्पर्धेत चर्चेचा विषय ठरला आहे.
अशातच 21 सप्टेंबर म्हणजेच काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहान आणि हारिस रौफ यांनी चालू सामन्यात असं काही केलं की ज्यामुळे क्रिकेटप्रेमींचा राग अनावर झाला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अद्याप ताज्या असताना या दोघांनी केलेलं सेलीब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यानंतर आता पाकिस्तानच्या एका शोमध्ये एका व्यक्तीच्या वक्तव्याने मर्यादीच्या सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत.
नेमकं काय म्हणाला पाकिस्तानी कॉमेडियन
दरम्यान ट्वीटर आणि इतर सोशल मीडियावर एका यूजरने पाकिस्तानी कॉमेंटेटरचा एक व्हिडीओ शेअर केला. यात तीन जण संवाद साधत होते. या शोमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली आणि कामरान अकमल हेही उपस्थित होते. त्यावेळी अँकरने शोमधील गेस्ट, कॉमेडियन मुस्ताफ चौधरीला एक प्रश्न विचारला. ज्यात अँकर म्हणाला की, "सर आता ज्याप्रकारे खेळाडू खेळत आहेत, ते पाहता खेळाडूंनी आणखी थोडे प्रयत्न केले तर आपण जिंकू शकतो का?"
यावर उत्तर देताना मुस्ताफ चौधरी म्हणाला की, "मला वाटते की, आपल्या काही मुलांनी तिथे फायरिंग करायला हवी होती आणि संपवायला हवा होता. कारण आपल्याला माहित आहे की आपण हरणार आहे." या वक्तव्यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात.
नेमकं काय घडलं होत?
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहानने 34 चेंडूत अर्धशतक ठोकल्यानंतर बॅट बंदुकीसारखी धरत गोळ्या झाडल्याची अॅक्शन करत आपल्या अर्धशतकाचे सेलीब्रेशन केले. तर दुसरीकडे हारिस रौफने प्लेन पाडण्याची ॲक्शन केली. या घटनेवर अनेकांच्या प्रतिकिया येत असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यानंतर हारिस रौफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असातना टीम इंडियाला सपोर्ट करणाऱ्या क्रिकेटप्रेमींनी विराटच्या नावाचा जयघोष करत हारिस रौफला जागा दाखवली आणि त्याचा माज उतरवलेला पाहायला मिळाला. क्रिकेटप्रेमींचा जयघोष ऐकून त्याने कानावर हात ठेवत काहीच न ऐकल्यासारखं केलं, पण त्याच्या तोंडावरचा रंग उडालेला पाहायला मिळाला.
भारताचा पाकिस्तानवर सलग दुसरा विजय
आशिया कप सुपर फोर सामन्यात भारताने दुबईत पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला असून भारतीय फलंदाजांनी दमदार खेळी करत पाकिस्तानचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. टॉस जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं.
भारताने 18.5 ओव्हरमध्ये 174 धावा करत सामना 6 विकेट्सने जिंकला. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीच्या जबरदस्त कामगिरीसोबतच हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, संजू सॅमसन या तिघांनीही चांगली बॅटिंग केली. भारताच्या या विजयामुळे पाकिस्तानला सलग दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली.