पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच या सामन्याला वेगळं महत्व प्राप्त झालं होतं. देशातील अनेक नागरिकांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध सामन्यावर निषेध व्यक्त केला होता. आशिया कप 2025 मधील दुबईत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील आक्रमक खेळ करत पाकिस्तानवर सात विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेलं 128 धावांचं साधं लक्ष्य भारताने केवळ 16 व्या षटकात गाठलं.
दरम्यान काल झालेल्या भारत-पाकिस्तान या हायवेटेज सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आणि संपुर्ण टीमने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. सामना पार पडल्यानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंगरूमकडे निघाले आणि त्यांनी ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश करताच दरवाजा बंद केला. तर दुसरीकडे पाकिस्तान संघातील खेळाडू हे मैदानातच हस्तांदोलन करण्यासाठी थांबले होते. मात्र टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना दुर्लक्षित करुन हात मिळवणी करण्यासाठी नकार दिला.
सामना सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमारर यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांनी हस्तांदोलन केले नव्हते. सामना पार पडल्यानंतर काही तासांतच पीसीबीने निवेदन जारी करून औपचारिक विरोध नोंदवला. यावेळी त्यांनी म्हटलं की, टॉसदरम्यान हात न मिळवण्याची मागणी आधीच भारताकडून झाली होती. यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, टीम इंडियातील खेळाडूंनी केलेल्या या कृतीमुळे त्यांच्यावर कोणती कारवाई होणार का?
तर ICC आणि ACC चा नियमानुसार, पाकिस्तान संघाच्या खेळांडूसोबत हस्तांदोलन न केल्यामुळे टीम इंडियावर दंड किंवा कारवाई अशी कोणतीच भूमिका घेतली जाऊ शकत नाही. यामगचं कारण असं की, क्रिकेटच्या कोणत्याही नियमपुस्तिकेत सामना संपल्यानंतर हस्तांदोलन अनिवार्य असल्याचं म्हटलेल नाही. सामना संपल्यानंतर खेळांडूंमध्ये होणार हस्तांदोलन करणं हा कसलाही नियम नसून खेळभावनेची कृती आहे. मात्र मुद्दाम प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन करणे टाळले तर त्याला खेळभावनेच्या विरुद्ध केलेली कृती मानले जाते.