25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. आज भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रंगताना पाहायला मिळत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची फायनल आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू झाला असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 7 गडी गमावत भारताला 252 धावांचे आव्हान दिले आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी कोण ठरणार याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
'सर' जडेजा निवृत्ती घेणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलदरम्यान रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जडेजाने या सामन्यातील शेवटचा बॉल 40 व्या ओव्हरमध्ये टाकला. रवींद्र जडेजाच्या या सामन्यातील 10 ओव्हरचा स्पेल पूर्ण झाल्यानंतर विराट त्याच्या जवळ आला आणि दोघांनी एकामेकाला मिठी मारली.
त्यावेळेस कॅमेरामॅनने त्या दोघांकडे कॅमेरा फिरवला आणि हा क्षण कॅमेरामध्ये कैद होताच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हयरल होऊ लागले. ज्यामुळे अंतिम सामन्यानंतर जडेजा निवृत्त होणार का ? अशा चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. यादरम्यान भारताचा अष्टपैलू फिरकीपटू यापुढे टीम इंडियासाठी वनडेमध्ये खेळणार नसल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. मात्र, अद्याप या गोष्टींची चर्चा सुरु आहे, यात काय तथ्य आहे हे वेळ आल्यावर समोर येईल.