भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल पुन्हा एकदा मैदानावरील कामगिरीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्क्रीनशॉट दिसत होता. त्या निर्णयात म्हटले आहे की, “आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या पत्नीने पतीकडून पोटगी मागू नये.” या पोस्टसोबत चहलने लिहिले होते, “घ्या आईची शप्पथ, की या निर्णयावरून पलटी मारणार नाही.”
ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर चहलने ती डिलीट केली. पण तोपर्यंत चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती की, ही पोस्ट त्याची पूर्व पत्नी धनश्री वर्मावरचा अप्रत्यक्ष टोमणा तर नाही ना? अनेकांनी ही पोस्ट त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहिली, तर काहींनी ती न्यायालयीन निर्णयाचे समर्थन असल्याचे म्हटले.
युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचे लग्न डिसेंबर 2020 मध्ये झाले होते. मात्र काही वर्षांतच त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाले आणि मार्च 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांचा घटस्फोट झाला. माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, या घटस्फोटानंतर धनश्रीला कोटी रुपयांची पोटगी मिळाली, मात्र दोघांनीही या बाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती.
चहलच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया ओसंडून वाहत आहेत. काहींनी त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले, तर काहींनी सल्ला दिला, “भूतकाळ विसर, पुढे चल, मूव्ह ऑन!” युजवेंद्र आणि धनश्री या चर्चेमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.