विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने अवघ्या चार सामन्यांत तीन खणखणीत शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुडुचेरीविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात त्याने 116 चेंडूंमध्ये 113 धावांची दमदार खेळी करत पुन्हा एकदा भारतीय वनडे संघाच्या चर्चेत आपले नाव आघाडीवर नेले आहे.
या स्पर्धेतील सुरुवातीपासूनच पडिक्कल सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. याआधी त्याने झारखंडविरुद्ध 147 धावा आणि केरळविरुद्ध 124 धावांची शानदार शतके ठोकली होती. तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात तो मोठी खेळी करू शकला नाही, मात्र चार सामन्यांत एकूण 405 धावा करत तो स्पर्धेतील सर्वात सातत्यपूर्ण फलंदाजांपैकी एक ठरला आहे.
पुडुचेरीविरुद्ध कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. पडिक्कल आणि कर्णधार मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 228 धावांची सलामी भागीदारी केली. जवळपास 38 षटकं दोघांनी गोलंदाजांना संधी दिली नाही. पडिक्कलच्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. अखेर त्याला 113 धावांवर जयंत यादवने बाद केले.
लिस्ट-A क्रिकेटमध्ये पडिक्कलचे आकडे प्रभावी आहेत. अवघ्या 36 डावांत त्याने 12 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत. भारतासाठी त्याने कसोटी आणि टी-20 सामने खेळले असले तरी वनडेमध्ये अद्याप संधी मिळालेली नाही. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा 3 किंवा 4 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि कर्णधार शुभमन गिल यांचा समावेश अपेक्षित असून, पडिक्कलला संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.