पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर भारताचा निसटता पराभव होऊन न्यूझीलंडनं बाजी मारल्यानंतर आता दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी नेमके सामने कसे होणार आहेत, याची माहिती आयसीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे.
येत्या ४ ऑगस्ट रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू होणाऱ्या टेस्ट मॅचपासून या दोन वर्षे चालणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होणार आहे.त्यासोबतच, यावेळी काही प्रमाणात गुण देण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.
सामने
दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला पुढील महिन्यात ४ ऑगस्टला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. पहिल्या चॅम्पियनशिपप्रमाणेच याही वेळी प्रत्येक संघाला एकूण ६ टेस्ट मॅच सीरिज खेळाव्या लागणार आहेत. यापैकी ३ इतर देशांमध्ये तर ३ स्वदेशात खेळाव्या लागणार आहेत.त्यात बांगलादेश, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. तर भारतात होणऱ्या सीरिजमध्ये श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरोधातील सीरिजचा समावेश आहे.
पॉइंटस पद्धतीत बदल
२०२१ ते २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होणार आहे. या दरम्यान प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला १२ पॉइंट दिले जातील. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी ६ गुण तर सामना ड्रॉ म्हणजेच अनिर्णित झाला, तर ४ पॉइंट दिले जातील.