थोडक्यात
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना काल झाला
उत्तर प्रदेशच्या सचिन यादवने उल्लेखनीय कामगिरी केली
जागतिक स्पर्धेत नीरज चोप्रा 8व्या स्थानी
(Neeraj Chopra) भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यंदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे चमक दाखवू शकला नाही. तब्बल 2566 दिवसांनंतर त्याला पहिल्या तिघांमध्ये स्थान मिळाले नाही. सातत्याने 7 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविल्यानंतर टोक्यो येथे झालेल्या या स्पर्धेत तो आठव्या क्रमांकावर राहिला. भारतासाठी मात्र सचिन यादवने उत्कृष्ट कामगिरी करत चौथ्या स्थानी झळकले आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशा निर्माण केली.
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटने 88.16 मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स (87.38 मीटर) रौप्याचा मानकरी ठरला, तर अमेरिकेचा कर्टीस थॉम्पसनने 86.67 मीटरसह कांस्य पटकावले. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 84.08 मीटरची सर्वोत्तम फेक केली मात्र अपेक्षित पातळीवर तो चमक दाखवू शकला नाही. अखेरीस आठव्या क्रमांकावर राहिला.
याउलट, उत्तर प्रदेशचा 25 वर्षीय सचिन यादवने आपली सर्वोत्तम 86.27 मीटर फेक नोंदवत चौथ्या क्रमांक पटकावला. पहिल्याच प्रयत्नात दमदार फेक करून त्याने दिग्गजांना टक्कर दिली. पुढील फेऱ्यांमध्येही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली. सचिनने यापूर्वी आशियाई अजिंक्यपदात रौप्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
या स्पर्धेत सचिनने केवळ नीरजच नव्हे, तर पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम (82.75 मीटर) आणि डायमंड लीग विजेता जर्मनीचा ज्युलियन वेबर (86.11 मीटर) यांच्यापेक्षा उत्तम कामगिरी केली. अर्शदला दहावा क्रमांक मिळाला.