इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेर 7 विकेट गमावून 294 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताकडे ८९ धावांची आघाडी आली आहे. ही मोठी धावसंख्या उभारण्यात ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची मोलाची भूमिका आहे. ऋषभ पंत 101 धावा करून आऊट झाला तर वॉशिंग्टन सुंदर नाबाद 60 तर अक्षर पटेल नाबाद ११ धावांवर खेळत आहेत.
पहिल्या डावात इंग्लंड संघासारखा भारत गारद होतो का, अशी भीती सतावत असताना ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने कमान साभाळत भारताच्या डावाला आकार दिला. अवघ्या 117 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने दमदार शतक ठोकत ऋषभ पंतनं भारताच्या डावाला आकार दिला. मात्र, अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात ऋषभ पंत झेलबाद झाला. यांनतर वॉशिंग्टन सुंदरनं अक्षर पटेलला हाताशी धरून धावफलक वाढवला. ११७ चेंडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपलं अर्धशतक देखील पूर्ण केलं.
दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारतानं 7 बाद 294 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताकडे 89 धावांची आघाडी आली आहे. वॉशिंग्टन सुंदर नाबाद 60 तर अक्षर पटेल नाबाद 11 धावांवर खेळत आहेत. दरम्यान याआधी शुभमन गील शून्य धावांवर बाद झाला. रोहित शर्मा अर्धशतकापासून चुकला त्याने 49 धावा केल्या. पुजारा 17, विराट कोहली शून्य धाव, अजिंक्य 27, रविचंद्रन अश्विन 13 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाच्या फिरकीसमोर पहिल्या डावात इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं. इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स तर आर अश्विनने 3 बळी घेतले. तसेच मोहम्मद सिराजने 2 फलंदाजांना माघारी धाडले.