थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
टी-20 वर्ल्डकप 2026 अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपला असताना भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून या निवडीत काही धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. खराब फॉर्ममुळे उपकर्णधार शुभमन गिलला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र याच खराब फॉर्मच्या यादीत नाव असूनही टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवण्यात आलं, यामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं आहे.
शुभमन गिलने टी-20 मध्ये अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे त्याला वगळण्यात आलं. गिलने 15 डावांमध्ये 291 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट 137 च्या आसपास आहे, जो टी-20 फॉरमॅटसाठी अपुरा मानला गेला. त्यामुळे सिलेक्टर्सनी कठोर निर्णय घेत गिलला संघातून बाहेर केलं. मात्र सूर्यकुमार यादवची स्थितीही फार वेगळी नव्हती. यंदा SKY ने 19 डावांमध्ये फक्त 218 धावा केल्या असून त्याचा फॉर्म अत्यंत निराशाजनक राहिला आहे. तरीही त्याला संघात कायम ठेवण्यात आलं. यामागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न उपस्थित होत होता.
PTI च्या अहवालानुसार, सूर्यकुमार यादवला मिळालेली संधी ही केवळ त्याच्या कर्णधारपदामुळे आहे. वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेआधी कर्णधार बदलण्याचा धोका सिलेक्टर्स टाळतात. त्यामुळेच खराब फॉर्म असूनही SKY ला थोडा वेळ दिला गेला आहे, असं स्पष्ट केलं जात आहे.
मात्र ही सूट कायमस्वरूपी नाही. अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की गौतम गंभीरच्या विचारसरणीत कामगिरीला सर्वोच्च महत्त्व आहे. धावा काढल्या नाहीत तर कर्णधार असला तरी बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. आज गिल संघाबाहेर आहे, उद्या सूर्यकुमार यादवही असू शकतो, असा इशाराच यातून देण्यात आला आहे.
दरम्यान, गिलच्या जागी संजू सॅमसनवर विश्वास दाखवण्यात आला असून त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 22 चेंडूत 37 धावा करत निवडीचं समर्थन केलं. एकूणच सिलेक्टर्सचा संदेश स्पष्ट आहे. या संघात फक्त कामगिरीच महत्त्वाची, नाव किंवा पद नाही.
• शुबमन गिल खराब फॉर्ममुळे संघाबाहेर ठेवलं
• सूर्यकुमार यादव कर्णधार असल्यामुळे संघात कायम ठेवला
• संजू सॅमसनला संधी दिली आणि त्यांनी कामगिरीने समर्थन केलं
• सिलेक्टर्सचा संदेश: संघात फक्त कामगिरी महत्त्वाची, नाव किंवा पद नाही