क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा आयसीसी अंडर 19 गटातील महिला टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. मलेशियामध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. 2023 मध्ये झालेल्या पहिल्या हंगामात इंग्लंडचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले होते.
फायनल सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या दडपणाखाली त्यांचा डाव 20 षटकांत 10 बाद 82 धावांवर संपला. भारताकडून गोंगाडी त्रिशा ने 4 षटकांत 15 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. शबनम शकीलने एक विकेट घेतली.
83 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली. मात्र, 36 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर गोंगाडी त्रिशा आणि सानिका चाळके यांनी संघाला विजय मिळवून दिला. भारताने या सामन्यात 9 विकेट्स आणि 52 चेंडू राखून विजय मिळवला. त्रिशाने नाबाद 44 धावा केल्या, तर सानिकाने नाबाद 26 धावांचे योगदान दिले.