भारताच्या युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने 2025 चा महिला चेस वर्ल्ड कप जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केवळ 19 वर्षांच्या दिव्याने जॉर्जियाच्या बाटुमी येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्याच दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पीला पराभूत करत हे बहुमान पटकावले. या विजयासह दिव्या वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली असून, ती भारताची चौथी महिला ग्रँडमास्टरही बनली आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामना पूर्णपणे भारतीय खेळाडूंचा होता. त्यामुळे भारताला चॅम्पियन मिळणार हे निश्चित होते, परंतु तरुणतेच्या उत्साहाने अनुभवाला हरवत दिव्याने बाजी मारली. शनिवार, 26 जुलै रोजी पहिला डाव खेळला गेला. दिव्या विजयाच्या अगदी जवळ पोहोचली होती, पण शेवटच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे सामना बरोबरीत सुटला. रविवारी दुसऱ्या डावातही तसंच घडलं. परिणामी टायब्रेक खेळवण्यात आला.
38 वर्षांची कोनेरू हम्पी रॅपिड फॉरमॅटमध्ये अधिक अनुभवी असल्याने तिचा वरचष्मा अपेक्षित होता. पण सोमवारी, 28 जुलै रोजी टायब्रेकमध्ये दिव्याने अप्रतिम खेळ करत हम्पीला तिच्याच खेळात गुंतवत चूक करण्यास भाग पाडलं आणि विजेतेपद आपल्या नावावर केलं. ही केवळ एक स्पर्धा नव्हे, तर दिव्याच्या सातत्यपूर्ण यशाचा तिसरा सोनेरी अध्याय ठरला. याआधी तिने जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं.
त्यानंतर बुडापेस्टमध्ये झालेल्या चेस ऑलिंपियाडमध्ये भारतीय महिला संघाला विजेते बनवण्यात तिचा मोठा वाटा होता. वैयक्तिक गटातही तिने सुवर्णपदक पटकावलं होतं. दिव्याचा हा यशस्वी प्रवास केवळ तिच्यासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय बुद्धिबळासाठी एक प्रेरणादायी पर्व ठरला आहे. ती आज देशातील तरुण बुद्धिबळपटूंकरिता आदर्श बनली आहे. भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात तिचं नाव आता अजरामर झालं आहे.