क्रीडा

मुंबईचा तब्बल 27 वर्षांनंतर इराणी चषकावर कब्जा; पहिल्या डावातील आघाडीमुळे विजयी घोषित

गतहंगामात रणजी जेतेपदाची आठ वर्षांची प्रतीक्षा संपविणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने नव्या हंगामातील पहिल्याच लढतीत आपला 27 वर्षांपासूनचा इराणी चषकातील अजिंक्यपदाचा दुष्काळही संपविला.

Published by : Dhanshree Shintre

गतहंगामात रणजी जेतेपदाची आठ वर्षांची प्रतीक्षा संपविणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने नव्या हंगामातील पहिल्याच लढतीत आपला 27 वर्षांपासूनचा इराणी चषकातील अजिंक्यपदाचा दुष्काळही संपविला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने बाजी मारली आणि 1997 नंतर प्रथमच प्रतिष्ठेच्या इराणी चषकावर कब्जा केला. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई क्रिकेटचे सुवर्णदिन परतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अष्टपैलू तनुष कोटियनने (नाबाद 114) शानदार शतकी खेळी साकारत दुसऱ्या डावात शेष भारताचा संघ पुनरागमन करू शकणार नाही याची काळजी घेतली.

लखनऊच्या एकाना स्टेडिअमवर झालेल्या या लढतीत शेष भारताच्या संघावर मुंबईने वर्चस्व गाजवले. पहिल्या डावातील आघाडीनंतर दुसऱ्या डावात मुंबईने झटपट गडी गमावले, पण पाचव्या दिवशी कोटियनच्या उत्कृष्ट फलंदाजीसमोर शेष भारताचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले. कोटियनला तळाच्या मोहित अवस्थीची (93 चेंडूंत नाबाद 51) उत्तम साथ लाभली. अखेर मुंबईने 8 बाद 329 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यानंतर सामना समाप्तीचा निर्णय घेण्यात आला. मुंबईकडे तब्बल 450 धावांची आघाडी होती. कोटियन 150 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह 114 धावा करून नाबाद राहिला.

चौथ्या दिवसअखेर मुंबईची 6 बाद 153 अशी स्थिती होती. पाचव्या दिवशी सुरुवातीला ऑफ-स्पिनर सारांश जैनने सर्फराज खान (17) आणि शार्दूल ठाकूर (2) यांना बाद करत शेष भारताच्या पुनरागमनाच्या आशा पल्लवित केल्या. त्यावेळी मुंबईची 8 बाद 171 अशी स्थिती होती आणि त्यांच्याकडे 292 धावांची आघाडी होती. त्यानंतर मात्र कोटियन आणि अवस्थी जोडीने आठव्या गड्यासाठी 200 चेंडूंत 158 धावांची अभेद्या भागीदारी रचत शेष भारताच्या आशा संपुष्टात आणल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

FASTag Annual Pass : आजपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार

Jammu Kashmir : किश्तवाडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आणि भूस्खलन; दुर्घटनेत 46 जणांचा मृत्यू

Independence Day 2025 : PM Narendra Modi : भगवा फेटा,अन् पांढरा सदरा; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचा खास पेहराव

PM Narendra Modi : तरुणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा; 15 हजार रुपये मिळणार, नेमकी काय आहे 'ही' योजना ?