(Norway Chess 2025) नॉर्वे बुद्धिबळ 2025 स्पर्धेच्या सहाव्या फेरीत भारताच्या डी. गुकेशने जबरदस्त कामगिरी करत माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. हा विजय विशेष ठरला कारण काही आठवड्यांपूर्वीच कार्लसनने गुकेशला हरवले होते. मात्र, गुकेशने त्या पराभवाचा बदला घेत अखेर जगप्रसिद्ध खेळाडूवर मात केली.
19 वर्षीय गुकेशने 62 चाली खेळत कार्लसनचा पराभव निश्चित केला. सामन्याच्या सुरुवातीला कार्लसन आघाडीवर असला तरी शेवटच्या टप्प्यात गुकेशने अचूक आणि धाडसी चालींनी बाजी मारली. पराभवाच्या क्षणी कार्लसन खूप अस्वस्थ झाला आणि त्याने चेस टेबलवर हात आपटल्याचा क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या विजयामुळे गुकेशने स्पर्धेच्या गुणतालिकेत 8.5 गुण मिळवत तिसरे स्थान मिळवले आहे. आता तो केवळ एक गुणाने कार्लसन आणि अमेरिकेचा खेळाडू फॅबियानो कारुआनापेक्षा मागे आहे. गेल्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूने कार्लसनवर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवला आहे.