( Suryakumar Yadav ) भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व करणारा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या विश्रांती घेत आहे. आयपीएल 2025 मध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर तो काही दिवसांसाठी परदेशात आहे. पॅरिस आणि लंडनमध्ये पत्नी देविशा शेट्टीसोबत वेळ घालवल्यानंतर, तो सध्या जर्मनीमध्ये असून तिथे त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे.
सूर्यकुमारने म्यूनिचमधील रुग्णालयातून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने सांगितले की त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. देविशा शेट्टी हिनेही हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत पतीची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले.
देविशा सध्या तिच्या युट्युब चॅनेलवर पॅरिस आणि लंडन सहलीचे व्हिडिओ शेअर करत आहे. सूर्यकुमार आणि देविशा यांनी आपल्या सहलीचे अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले.
दरम्यान, बीसीसीआयने टी-20 संघाची धुरा रोहित शर्मानंतर सूर्यकुमारकडे सोपवली आहे. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तो बांगलादेश दौऱ्यात खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत व्यस्त असून, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौरा होणार आहे. या दौऱ्यात 26 ते 31 ऑगस्ट दरम्यान टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.