थोडक्यात
भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला
सूर्यकुमार यादवने आपल्या भावनिक शब्दांनी संपूर्ण देशाचं मन जिंकलं.
हा विजय आमच्या शूरवीर सैनिकांना समर्पित, असे सूर्यकुमार यादव म्हणाला
(Suryakumar Yadav) दुबईत झालेल्या आशिया कप 2025 च्या उच्चांकी सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत सुपर-4 फेरीत आपलं स्थान जवळपास निश्चित केलं. विशेष म्हणजे, या सामन्याचा दिवस भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा वाढदिवस होता आणि त्याने या दिवशी आपल्या नेतृत्वगुणांनी व धडाकेबाज खेळीने संघाला विजय मिळवून दिला.
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला देशात मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. कारण एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर सामना खेळवण्याचा निर्णय झाल्यामुळे बीसीसीआय आणि सरकारवरही टीका झाली. मात्र, सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या भावनिक शब्दांनी संपूर्ण देशाचं मन जिंकलं.
त्याने स्पष्टपणे सांगितलं की "हा विजय आमच्या शूरवीर सैनिकांना समर्पित आहे. पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या भारतीयांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. सैन्याचं शौर्य आम्हाला नेहमी प्रेरणा देतं आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणावं, अशी आमची इच्छा आहे."
भारतीय संघाच्या या सामन्यातील कामगिरीने पाकिस्तानला प्रत्येक आघाड्यावर मागे टाकलं. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळून एक प्रकारे कठोर संदेशही दिला. या विजयाने केवळ भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं नाही, तर पहलगाम हल्ल्यातील शहीद जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांना एकात्मतेचा दिलासा दिला. सूर्यकुमार यादवचा हा भावनिक संदेश भारतीय क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे.