(Veda Krishnamurthy) सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका रंगतदार सुरू आहे. महिला संघानेही नुकतीच इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. एका महिला खेळाडूने निवृत्ती जाहीर केली.भारतीय महिला क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्तीची माहिती दिली.
वेदा कृष्णमूर्ती ही कर्नाटकमधील एका छोट्या शहरातून आलेली खेळाडू असून ती आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जात होती. तिने भारतासाठी 48 एकदिवसीय आणि 76 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत 820 तर टी-20 मध्ये 875 धावा आहेत. तिने एकूण 8 अर्धशतके झळकावली असून, 2017 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध 70 धावांची वेगवान खेळी तिच्या सर्वोत्तम कामगिरींपैकी एक मानली जाते.
निवृत्तीची घोषणा करताना वेदाने लिहिलं."एका छोट्या गावातून भारताची जर्सी घालण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खास होता. क्रिकेटमुळे खूप काही शिकायला मिळालं, अनेक आठवणी मिळाल्या. खेळ सोडतेय पण क्रिकेट माझ्या मनात कायम राहील. भारतासाठी खेळल्याचा अभिमान नेहमीच असेल." तिच्या या निर्णयावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तसेच निवृत्ती घेतल्याने चाहते नाराज सुद्धा आहेत.