विराट कोहलीने टी20 आणि कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहे. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली त्यासाठीच खेळत होता. पण या स्पर्धेत दोन सामने खेळणार अशी माहिती होती. पण आता आणखी एक सामना खेळणार आहे.
दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी माहिती दिली की विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीत आणखी एक सामना खेळणार आहे. 6 जानेवारी रोजी बंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये रेल्वेविरुद्ध त्याचा सामना होणार असून, हा या स्पर्धेतील त्याचा तिसरा सामना ठरेल.
11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या घरच्या वनडे मालिकेच्या तयारीसाठी विराट कोहली अजून एक सामना खेळणार आहे. एकदिवसीय फॉर्मेटसाठी आपली तयारी पक्की करण्याच्या उद्देशाने तो 6 जानेवारीला होणाऱ्या सामन्यात उतरणार असून, या सामन्याकडे त्याची सराव लढत म्हणून पाहिले जात आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांत उत्तम फलंदाजी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. एका डावात त्याने 131 तर दुसऱ्या डावात 77 धावा केल्या. या कामगिरीमुळे दिल्लीला विजय मिळाला असून, न्यूझीलंडविरुद्धही असा फॉर्म कायम राहावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी पीटीआयला सांगितले की विराट कोहली सध्या खेळत असून त्याने तीन सामन्यांसाठी आपली उपलब्धता दिली आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या सूत्रांनुसार न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय वनडे संघ 8 जानेवारीपर्यंत वडोदरा येथे एकत्र येईल आणि कोहली त्याआधी सरावासाठी पोहोचू शकतो.