मुंबई-नायर रुग्णालयात 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाची ट्रायल सुरू झाली आहे. हि ट्रायल 8 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून केवळ चार दिवसांत सहा मुलांची यशस्वी ट्रायल करण्यात आली आहे. मुलांच्या लसीकरणाच्या ट्रायलसाठी नोंदणी सुरूच असून पालक-मुलांनी यासाठी मोठय़ा संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक आणि नायरचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी केले आहे. मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये 14 नोव्हेंबरपर्यंत 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांना एकूण 13359678 डोस देण्यात आले आहेत.
यामध्ये 8578685 जणांनी पहिला डोस तर 4780993 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवात होणार असल्यामुळे नायर रुग्णालयात 12 ते 18 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये लहान मुलांवरील कोरोना लस आली आहे. इतकेच नाही तर अनेक देशांनी मुलांना लस देण्यास सुरुवातही केली आहे. तज्ज्ञांनीही लहान मुलांना लस दिली जावी असे सूचवले आहे. लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. दुसऱ्या लाटेत अनेक चिमुकले कोरोनाबाधीत झाले होते. भारतातही अनेक मुलांना बाधा झाली मात्र सुदैवाने त्याची तीव्रता कमी होती. ज्या मुलांना कोरोना झालेला नाही, त्यांना लस दिल्यास ते आणखी सुरक्षित होतील असे तज्ज्ञांचे मत आहे.