आज, रेशन कार्ड हे केवळ अन्नधान्याच्या वितरणासाठीच नव्हे, तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि ओळखपत्र म्हणूनही महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. रेशन कार्ड हे सरकारमान्य ओळखपत्र मानलं जातं. हे कुटुंबातील सदस्यांची अधिकृत माहिती दर्शवतं. अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा आधार घेतला जातो.
पत्त्याचा आणि ओळखीचा पुरावा म्हणून विविध ठिकाणी वापर केला जातो. पासपोर्ट, गॅस कनेक्शन, बँक खाते उघडण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं. ग्रामीण भागात तर हे सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र मानलं जातं. रेशन कार्ड हे अनेक कुटुंबांसाठी केवळ ओळखपत्र नाही तर स्वस्त दरात अन्नधान्य मिळवण्यासाठी अत्यावश्यक साधन आहे. मात्र रेशन दुकानात जाताना कार्ड घरी विसरल्यास किंवा नवीन कार्ड अजून मिळाले नसेल, तर चिंता वाटणं स्वाभाविक आहे.
आता या त्रासातून सुटका मिळणार आहे. भारत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक सोयीस्कर डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे – ‘Mera Ration 2.0’ नावाचं अॅप. या अॅपच्या मदतीने वापरकर्ते मोबाईलवरच आपलं डिजिटल रेशन कार्ड पाहू शकतात आणि तेच रेशन दुकानदाराला दाखवून धान्य मिळवू शकतात.
डिजिटल रेशन कार्ड कसे वापराल?
1. सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘Mera Ration 2.0’ हे अॅप Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करा.
2. अॅप इन्स्टॉल झाल्यावर ते उघडा आणि तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
3. नंतर ‘Login with OTP’ वर क्लिक करा. आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
4. लॉगिन झाल्यावर तुमचं डिजिटल रेशन कार्ड मोबाईल स्क्रीनवर दिसेल.
5. हे कार्ड दुकानदाराला दाखवून धान्य घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
जर तुमच्याकडे अजून रेशन कार्ड नसेल आणि सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारायच्या टाळायच्या असतील, तर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संकेतस्थळावर किंवा आपले सरकार पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. https://rcms.mahafood.gov.in ही सेवा मोबाईल-आधारित असल्यामुळे तुमचं कार्ड कधीही आणि कुठेही सहजपणे उपलब्ध होईल. त्यामुळे रेशन कार्ड विसरल्याने धान्य मिळण्यात अडथळा येणार नाही.