सायबर सुरक्षेशी संबंधित एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. एका संशोधकाच्या माहितीनुसार, १८.४ कोटींपेक्षा अधिक पासवर्ड इंटरनेटवर लीक झाले आहेत. विशेष म्हणजे हे पासवर्ड अॅपल, गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या नामवंत टेक कंपन्यांशी संबंधित वापरकर्त्यांचे आहेत. संशोधक जेरेमिया फाउलर यांनी हे लीक एका असुरक्षित डेटाबेसद्वारे उघड केल्याचा दावा केला आहे.
हा डेटाबेस एका सामान्य टेक्स्ट फाईलच्या स्वरूपात सापडला, ज्यामध्ये लाखो युजरनेम्स, ईमेल्स आणि पासवर्ड्स साठवलेले होते. या माहितीचा वापर करून बँक व आर्थिक खात्यांमध्ये लॉगिन करणे शक्य असल्यामुळे धोका अत्यंत गंभीर आहे.
ही माहिती कशी गोळा झाली याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे की, एखाद्या इन्फो-स्टीलिंग मॅलवेअरने ही माहिती चोरली असावी. अशा प्रकारच्या मॅलवेअरचा वापर सायबर गुन्हेगार करून, युजर्सची माहिती डार्क वेबवर विकतात. हा डेटा ज्या सर्व्हरवर होता, त्या होस्टिंग प्रोव्हायडरने मालकाची माहिती देण्यास नकार दिला आहे.
फाउलर यांनी लीक झालेल्या डेटातील काही लोकांशी संपर्क केला असता त्यांनी त्यांची माहिती खरी असल्याचे मान्य केले. अनेक जण एकाच पासवर्डचा वापर वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये करतात, त्यामुळे एकच पासवर्ड लीक झाला तरी इतर खात्यांनाही धोका निर्माण होतो.
तज्ज्ञ सांगतात की, पासवर्डमध्ये कॅपिटल व स्मॉल लेटर्स, अंक आणि स्पेशल कॅरेक्टर्स असावेत. टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन वापरणे आणि दर महिन्याला पासवर्ड बदलणे ही चांगली सवय ठरू शकेल. आणि हो — कोणाशीही पासवर्ड शेअर करू नका.