भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार आणि ग्वाल्हेरचे महाराज ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्या ग्वाल्हेरमधील 'जय विलास पॅलेस' वर दरोडा झाल्याचं उघड झाले आहे. आजवर सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या राजवाड्यात झालेल्या चोरीनं पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक रत्नेश तोमर यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार 'बुधवारी सकाळी गच्चीवरुन एक चोर राजवाड्यात शिरला होता, अशी सूचना राणी महलातून मिळाली. ही माहिती मिळताच तातडीने विशेष तुकडीसह पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम राजवाड्यात पाठवण्यात आली.' पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जय विलास पॅलेसमध्ये जाऊन ज्या खोलीत चोरी झाली त्याची पाहणी केली. तसेच तेथील बोटांचे ठसे हस्तगत केले आहेत.
श्रीमंत जयाजी राव शिंदे यांनी 1874 साली हा राजवाडा बांधला आहे. जवळपास 40 एकर परिसरात हा राजवाडा पसरला असून याची किंमत साधारण 4 हजार कोटी आहे.