India

तौत्के चक्रीवादळाचा दोन दिवस धोका

Published by : Lokshahi News

अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळ तीव्र स्वरूप धारण करीत गुजरातच्या दिशेने निघाले असून येत्या दोन दिवसांत ते त्याच्या वाटेवर असलेल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तौत्के चक्रीवादळ शनिवारी केरळजवळून पुढे सरकल्यानंतर दक्षिण कोकणातल्या काही भागांत पाऊस कोसळू लागला आहे. १६ आणि १७ मे रोजी हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तौत्के चक्रीवादळ शनिवारी पूर्व-मध्य आणि लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर घोंगावत होते. केरळपासून ते जवळ होते. त्यामुळे या भागासह कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. केरळपासून आता ते पुढे सरकत असून गोवा आणि कोकण किनारपट्टीला समांतर पुढे जाणार आहे. गोव्यातही सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच पुणे जिल्ह्याच्या काही भागांना त्याची झळ बसेल. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी गोव्यापासून २२० किलोमीटरवर होते. सध्या ताशी ३० ते ४० किलोमीटरने ते संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने उत्तर-पश्चिाम पुढे जात आहे. मुंबईपासून ते सुमारे ८०० किलोमीटर अंतरावर आहे. पुढील दोन दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. या भागांसह आजूबाजूच्या काही परिसरातही १६ आणि १७ मे रोजी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. किनारपट्टीवर ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.

तौत्के चक्रीवादळ १६ मे रोजी अतितीव्र स्वरूप धारण करणार आहे. त्यामुळे समुद्रात वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १७५ किलोमीटर असेल. १६ ते १८ मे या कालावधीत ते अतितीव्रच राहणार असून याच काळात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या संभाव्य मार्गानुसार चक्रीवादळ १८ मे रोजी दुपार्री किंवा संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरजवळ धडकून पुढे जाईल. त्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव कमी होईल. मात्र, त्यामुळे गुजरातमध्ये त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात चक्रीवादळाचा परिणाम होणार नसला तरी या भागातील कमी दाबाच्या वेगळ्याच क्षेत्रामुळे पावसाची शक्यता आहे. उत्तर पूर्व राजस्थानपासून थेट मराठवाड्यापर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागातील पाणीपुरवठा आज राहणार बंद

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर

Earthquake in Alaska : अमेरिकेत भूकंपाचे तीव्र धक्के; आता त्सुनामीचाही दिला इशारा

Rajasthan School Girl: 9 वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका