दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे आजची वसुबारस. वसुबारसेला गोवत्स द्वादशी असं ही म्हटलं जातं आणि त्यानिमित्तानी सवत्स गाईचं पूजन केलं जातं. भारतात आपण गाईकडे प्राणी म्हणून नाही, तर गोमाता म्हणून बघतो. पूर्वीच्या काळी ज्या घराघरात गाय असेल तिला घरातल्या सदस्या प्रमाणेच वागवलं जात असे. हिंदू धर्मात आपण जेवायच्या आधी गाईला गोग्रास देण्याची पद्धत आहे. आज घरात जरी गाय नसली तरी पुन्हा एकदा तिचं महत्त्व आणि आरोग्यामधलं अतुल्य योगदान संपूर्ण जगाच्या लक्षात आलेलं आहे.
श्रीरामांचा जन्म ज्या रघुकुळात झाला, त्याच रघुकुळात दिलीप राजा नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्यानी गाईची सेवा करून, रघुवंशाची वृद्धी केली. मुख्य म्हणजे स्वतः राजा असूनही, दिलीप राजानी गायीची सेवा स्वतः केली. गाईला वनात चरायला घेऊन जाणं, तिची स्वच्छता राखणं, तिचं दूध काढणं अशा सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः केल्या, इतकंच नाही तर स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता गायीचा जीव वाचवला. गाईचे आलिंगन थेरपी
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण सध्या अनेक विकसित देशांमध्ये गाईला आलिंगन घालण्याची थेरपी नावाची एक रोगनिवारणाच्या उपचाराची पद्धत लोकप्रिय होते आहे. नैराश्य, मानसिक ताण, चिंता, एकाकीपणा अशा मानसिक त्रासांवर गाईला आलिंगन घालण्याची थेरपी म्हणजे गाईच्या सहवासात राहणं, तिला कुरवाळणं, तिला खाऊ घालणं हे एखाद्या उपचाराप्रमाणे उपयोगी पडतं असं संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे.
यात म्हटलं आहे की गाईचं शरीर हे मानवी शरीरापेक्षा थोडं गरम, उबदार असतं आणि तिच्या श्र्वासाची, हृदयाची गती मानवी हृदयापेक्षा संथ असते. त्यामुळे गायीच्या संपर्कात राहिल्यामुळे मनुष्य आश्वस्त होतो, त्याचं मन शांत होतं, ताण, उत्साह, हे करू का ते करू, एकाच वेळी काय काय करू अशी जी उत्कंठा असते ती कमी व्हायला मदत मिळते. आपल्या भारतीयांना हे गाईच्या सहवासात राहणं काही नवीन आहे का? वसुबारसेच्या निमित्ताने आपणही हजारो वर्षांपासून करत आलेलो आहोतच पण याच्याही पुढे जाऊन गाईचं दूध, ताक, लोणी, तूप या गोष्टी आरोग्यासाठी, शक्तीसाठी कशा उपयुक्त आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे.
तर मग चला, दीपावलीच्या पहिल्या दिवशी गोमातेचं पूजन करूया, गायीच्या सहवासात सकारात्मकतेचा अनुभव घेऊया, शिवाय A2 गाईचे दूध, त्यापासून पारंपारिक पद्धतीने बनवलेले तूप या गोष्टी रोजच्या आहारात ठेवूया आणि आरोग्याचा अनुभव घेऊया. पुन्हा एकदा सर्वांना आजच्या वसुबारसेच्या शुभेच्छा!