मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण ठरविण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने बुधवारच्या बैठकीत 19 निकष निश्चित केले आहेत. मात्र आयोगाच्या बैठकीला 11 पैकी केवळ 5 सदस्यच उपस्थित असल्यामुळे निकष अंतिम करण्यासाठी 4 जानेवारीला पुण्यात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. यासह ‘गोखले इन्स्टिट्यूट’ला नमुना तपासणीचे काम देण्यात आले असून, त्याबाबतचा अहवाल आयोगाला सादर केला जाणार आहे. त्याच्या आधारे आयोगाने तयार केलेल्या चार उपसमित्या सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. महिनाभराच्या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करून राज्य सरकारला अहवाल देण्यात येणार आहे.