नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात विष्णू भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्री विष्णू भगवंतांची विराट मूर्ती इंदौर ते शहादा असा 250 किलोमीटरचा प्रवास करुन महाराष्ट्रात दाखल झाली आहे. यावेळी शहादा शहरात भगवंतांच्या मूर्तीचं भव्य स्वागत करण्यात आलं आहे. जगातील एकमेव अशी दुर्मिळ श्री शेषशाही विष्णु भगवंतांच्या मूर्तीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेलं खेतिया या गावात भगवंताच्या मूर्तीचे आगमन झाल्यावर एकच जल्लोष करण्यात आला.
जगातील एकमेव नारायण मूर्ती शहाद्यात मोठ्या धुमधडाक्यात दाखल झाली आहे. ही मूर्ती 21 टन वजनाची, 11 फूट लांब आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलं आहे. स्वागतासाठी लाखो भाविक जमल्याचं पाहायला मिळालं. मूर्ती इंदुर ते शहादा 250 किलोमीटरचा प्रवास करून शहाद्यात आल्याने भक्तांचा उत्साहात शिगेला पोहोचला. संत श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या संकल्पनेतून शहादा येथे हे तीर्थ साकारत आहे. या श्री मंदिरात ही नारायण मूर्ती अडीच वर्षानंतर मंदिर निर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर विराजित होणार आहे. विष्णू मूर्तीच्या आगमनाने शहादा शहरात मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी देखील करण्यात आली. लाखोंच्या संख्येने भाविक जमल्यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली होती.