शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत गोगावले अघोरी पूजेसारख्या विधींमध्ये सहभागी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत "भरतशेठ आणि अघोरी विद्या म्हणजे पालकमंत्री का?" असा टोला लगावला आहे.
याआधीही ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावलेंवर अशाच स्वरूपाचे आरोप करत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी सांगितले की, 17 ऑक्टोबर 2024 रोजी गोगावले यांनी बगलामुखी मंदिरातून 11 पुजाऱ्यांना बोलावून अघोरी पूजा केली होती. तसेच, राज्याबाहेरून मांत्रिक बोलावण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व व्हिडीओ त्यांच्या जवळ आहेत आणि गोगावले यांनी नाकारल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली जाईल.
दरम्यान, गोगावले यांनी हे आरोप फेटाळले असून, "अघोरी पूजा केली असती, तर पालकमंत्रिपदासाठीच केली नसती का?" असा प्रतिप्रश्न करत त्यांनी स्पष्ट केलं की ते सदा पंढरपूर, सिद्धीविनायक आणि स्वामी समर्थ मंदिरात प्रार्थना करतात आणि कोणतीही अघोरी पूजा करत नाहीत. रायगडच्या पालकमंत्रिपदावरील वादामुळे हे आरोप होत असल्याचीही चर्चा आहे.