बीड जवळील घोडका राजुरी येथे पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या सुबोध मोरे, विराट घोडके आणि ओमकार घोडके या तीन तरुणांना एसटी बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. हे तीनही तरुण सर्वसामान्य घरातील होते. त्याच तरुणांच्या कुटुंबांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेत कुटुंबांचे सांत्वन केले.
बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीड परळी महामार्गावर हा अपघात घडला. बीडमधून परभणीत एक एसटी बस जात होती. त्यावेळी बीड -परळी महामार्गावर घोडका राजुरी फाट्याजवळ पाच जण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी गेले होते. यावेळी हे तरुण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करत होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने तरुणांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.