आज लोकसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 वर चर्चा सुरू झाली आहे. त्याआधी संजय राऊत यांनी वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वावरुन देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, "आम्हाला त्यांनी हिंदुत्व शिकवू नये. वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही", असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं.
राऊतांच्या या विधानावर भाजप कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी ट्वीट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "हिरवी काविळ झालेल्या नव्या दिव्य दृष्टीतून राऊत बघतायत, त्यामुळे वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, असं वाटणं हे साहजिकच असल्याचं" चव्हाण म्हणाले. "घरं, मंदिरं बळकावलेल्या हिंदूंना विचारा. वक्फ ग्रस्त हिंदू तुम्हाला शोकांतिका सांगतील, तेव्हा मनाला पाझर फुटेल", असंही रविंद्र चव्हाण म्हणाले. "तुमचा पक्ष काँग्रेसच्या पाठिंब्यावरच बांडगुळ झाला आहे. तेव्हा 'मालकीणबाईं'च्या सासूबाईंचं कोडकौतुक सुरू राहू देत", असं म्हणत त्यांनी सोनिया गांधी आणि इंदिरा गांधींचं नाव न घेता टोला लगावला आहे.
रविंद्र चव्हाणांचं ट्वीट
संजयजी,
'हिरवी कावीळ' झालेल्या ज्या नव्या दिव्य दृष्टीतून तुम्ही बघता, त्यातून तुम्हाला वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, असं वाटणं साहजिकच आहे. पण... वक्फ बोर्डाची हिंदूंच्या विरोधातील मनमानी खरंच जाणून घ्यायची इच्छा असेल, तर देशभरातील हिंदू मंदिरं आणि ज्या सर्वसामान्य हिंदूंची घरं वक्फ बोर्डाने बळकावली आहेत, त्यांना विचारा. ते 'वक्फग्रस्त' हिंदू ज्या शोकांतिका सांगतील, त्या ऐकून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल अशी आशा ! बाकी काँग्रेसच्या पाठिंब्यावरचं बांडगुळ झालाय तुमचा पक्ष... तेव्हा 'मालकीणबाईं'च्या सासूबाईंचं कोडकौतुक सुरू राहू देत !