बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सीआयडी आणि एसआयटीकडून तपास सुरु आहे. तर या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अद्याप फरार आहे. तसेच वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माजी सरपंच बालाजी तांदळेने वाल्मिक कराडची भेट घेतल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात आपल्यालाही अरेरावी केल्याचा आरोप केला होता. आता या बालाजी तांदळेचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
काय आहे या व्हिडिओमध्ये?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालाजी तांदळे हा देशमुख प्रकरणातील आरोपींसाठी ब्लॅंकेट खरेदी करताना दुकानामध्ये दिसत आहे. बालाजी तांदळेने सीआयडी ऑफिसर असल्याचं सांगत बीड शहर पोलीस ठाण्यात प्रवेश केला असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी तो वाल्मीक कराडला भेटला असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता. तर यावेळी बालाजी तांदळेने सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून धमकावल्याची तक्रार देखील धनंजय देशमुख यांनी केली होती.
तसेच बालाजी तांदळेने देशमुख प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला पाण्याच्या बाटल्या न्यायालयामध्ये दिल्याचे समोर आलं होतं. आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांना गेवराई येथील पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यावेळी आरोपींना लागणारे साहित्य हे बालाजी तांदळेने दुकानातून खरेदी केल्याचं या सीसीटीव्हीतून समोर आलं आहे.
पाहा सीसीटीव्ही फुटेज-