केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला भेट देण्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टिका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "संजय राऊत हे रोज नवीन शोध लावतात. देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचे दर्शन घ्यायला आले. त्यांचे स्वागत करायचे सोडून संजय राऊत काहीही बोलत सुटले आहेत. त्यांना कोणीही प्रतिसाद देत नाही आहे. संजय राऊतांची राजकीय दुश्मनी असावी. परंतू अशा प्रकारचा प्रसंगात ज्यावेळी देशाचे गृहमंत्री आले होते".
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, "अमित शाहाचं 500 पानी शिवभक्त हे पुस्तक पुण्यात कि दिल्लीत प्रदर्शित करायचं हा मुद्दा राहिला आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर संजय राऊतांना चक्कर येईल. तुम्हाला सत्तेत यायचं आहे परंतू कोणी घेत नाहीत, म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार आहात. रोज तुमची माणसं चालली आहेत. महानगरपालिकेच्या निवडणूका येईपर्यंत तुम्हाला लोकांच्या घरोघरी जाऊन आग्रह करावा लागेल. यांच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी आता पुढे तुमचं काय राहिलं. त्यांचे पाच नगरसेवक भाजपकडे आले आहेत. मुंबईतील ठाकरे गटाचे 92 मधले 57 नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेले आहेत. काय राहिले आहे" ठाकरे गटाकडे असे भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.