राज्यभरात सर्वत्र औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे रुमाल घालून हिंदुत्ववादी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. त्याचसोबत काँग्रेसच्या काळात त्यांनी अनेक मान्य नसलेल्या ठिकाणी संरक्षण दिले, परंतु हे सरकार हिंदुत्ववादी आहे ते योग्य निर्णय घेतील. अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.
याचपार्श्वभुमिवर नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात दगडफेक करण्यात येत आहे. काही नागरिक आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा फौज फाटा घटना स्थळी दाखल झाली असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शांततेच आवाहन करण्यात येत आहे.
"नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे", असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच "आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा", असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.