काल मुंबईच्या मालाडच्या पूर्वेला कुरार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पठाणवाडी येथे शोभायात्रादरम्यान दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर यापरिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण होतं. मात्र आता पूर्णपणे वातावरण शांत आहे. त्या अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे. नागरिकांनी शांत राहावं अफवांवर विश्वास ठेवू नका असं पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
काल गुढीपाडव्याच्यानिमित्ताने संध्याकाळी कलश शोभायात्रा निघत असताना, दोन तरुण मागे राहिले होते. त्यामुळे ते रिक्षामधून जात असताना त्यांच्या हातात दोन भगवे झेंडे होते. ते जात असताना जय श्रीरामचे नारे बोलत जात होते. त्यामुळे इतर समाजाच्या लोकांनी त्यांचा आवाज ऐकून त्या रिक्षाला थांबून त्यांच्यावर शिवीगाळ केली.
इतकंच नव्हे तर त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला ज्यामध्ये ते दोन्ही तरुण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्या तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले आहेत. ज्या लोकांनी त्या तरुणांना मारलं त्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्या आरोपीचं नाव अर्शान शेख असून इतर आरोपींचा तपास सुरु आहे.