तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील स्वच्छतेचं कंत्राट रद्द करण्यात आलंय. त्याचबरोबर जुनंच स्वच्छतेचं कंत्राट सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आणि इतर रुग्णालयांची यांत्रिक पद्धतीनं स्वच्छता करण्यासाठी पुण्यातील बीएसए कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. 18 सप्टेंबर 2024ला नवीन कंत्राटाचा कार्यादेश देण्यात आला होता. त्यात राज्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा, महिला आणि ग्रामीण मिळून 547 रुग्णालयं, तर एक हजार 969 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेचा ठेका आहे. या सर्व ठिकाणी महिन्याला 84 रुपये प्रति चौरस मीटर दरानं स्वच्छता करण्याचं हे कंत्राट आहे. पूर्वीचं कंत्राट कामाच्या स्वरुपानुसार दोन ते चार रुपये प्रति चौरस फूट दरानं होतं. यांत्रिकी पद्धतानं आरोग्य विभागाच्या रुग्णालयांची स्वच्छता करण्याचं कंत्राट सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलाय. त्यामुळे जुन्याच कंत्राटदाराची सेवा सुरू राहणारे.