संतोष देशमुख हत्येप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे चॅट रूपाली ठोंबरे यांनी सोशल मिडियावर व्हायरल केलं आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शंका व्यक्त केलीय. याची सखोल चौकशी सायबर सेलमार्फत व्हावी अशी मागणी तटकरे यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली पाटील यांनी ट्विट केलं होतं. रूपाली पाटील यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रूपाली पाटील ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर गुन्हा दाखल केला. आपल्याविरोधात खोटा एफआयआर दाखल करण्यात आला. आपण याविरोधात कायदेशीर लढाई लढायला तयार आहोत. बीडच्या पोलिसांना याबाबत सहकार्य करणार आहोत. मात्र, हा गुन्हा कोणत्या आधारे दाखल करण्यात आला असा सवाल त्यांनी केला आहे. एफआयआरमध्ये जितेंद्र आव्हाड यांची बदनामी केली. मात्र, पोलिसांनी कोणता तपास केला की ज्यामध्ये असं काय निष्पन्न झालं की त्यांनी एफआयआर दाखल केला असा सवाल रूपाली ठोंबरे पाटील यांनी विचारला आहे. अशा अनेक खोट्यानाट्या एफआयआर होत असतात, ते कोर्ट ठरवतं असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे हे त्यांना माहिती आहे का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.