कर्नाटक विधानसभेत असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो काही दिवसांपूर्वी तिथल्या काँग्रेस सरकारनं हटवला. त्यानंतर भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयावर टीका करण्यात आली. तसंच भाजपनं काँग्रेससोबत आघाडी केलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केलं. काँग्रेसकडून वेळोवेळी वीर सावरकरांचा अपमान तसेच टीका केली जाते. मात्र त्यावर उद्धव ठाकरेंची शिवसेना फारशी आपत्ती न दाखवता काँग्रेसला शरण जाते असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. सावरकरांच्या विषयावरुन भाजप ठाकरेंच्या शिवसेनेला नेहमीच लक्ष्य करत आलं आहे. भाजपनं वीर सावरकरांचा विषय सोशल मीडियावर उचलून आणि त्यावरुन ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सावरकरांचं कर्नाटक विधानसभेतलं हे तैलचित्र बसवराज बोम्मई सरकारनं लावलं होतं. काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करण्याची कोणतीच संधी सोडली जात नाही. स्वातंत्र्यवीर इंग्रजांना मिळाले होते असे आरोप काँग्रेसकडून केला जातो, असं म्हणत हा विषय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटलावर आणला आहे.