(Delhi Rain) दिल्ली आणि परिसरात शनिवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली, दक्षिण-पूर्व दिल्ली आणि मध्य दिल्लीसह शहराच्या अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसामुळे शास्त्री भवन, आर. के. पुरम, मोती बाग, किदवाई नगर यांसारख्या भागांत रस्त्यावर पाणी साचले. पंचकुईया मार्ग, मिंटो रोड, मथुरा रोड तसेच भारत मंडपमच्या गेट क्रमांक 7 जवळ पाण्याचा मोठा साठा झाल्याने सकाळच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
दिल्ली-एनसीआरमधील गाझियाबाद जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने सांगितले की, संपूर्ण दिल्ली व एनसीआरमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, वादळ आणि विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाचे वारे वाहू शकतात.
हवामान अंदाजानुसार, कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता सुरू राहील, असेही सांगण्यात आले आहे.