महाराष्ट्रात मॉन्सून आगमनानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये मुसळधार पावसाने वातावरण चिंब केले असून, हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
7 जूनच्या सकाळपासून मुंबई, पुणे आणि आजूबाजूच्या भागांमध्ये सतत पाऊस सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भातही आकाश ढगाळ असून, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कोकण आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये काही भागांत जोरदार सरी पडल्या. भोसरी एमआयडीसी परिसरातील शांतिनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाच्या पुणे विभाग प्रमुख के. एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि इंदापूर भागात तसेच मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आज वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता उपग्रहातून घेतलेल्या निरीक्षणानुसार पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा या भागांत ढगांची तीव्रता वाढत असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
हिंजवडी फेज 2 मधील रायन इंटरनॅशनल स्कूल परिसरात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नालेसफाईसारखी कामे वेळेत न होणं चिंताजनक आहे. एमआयडीसीने तातडीने लक्ष घालून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.
हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे. यात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, बीड, नांदेड, लातूर आणि इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. या इशाऱ्यांमध्ये शहरांतील सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.