संतोष देशमुख हत्त्या प्रकरणामुळे सध्या बीडमध्ये दहशत असल्याची पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बीडच्या अंबाजोगाईत वेगळ्याच कारणानं घाबरगुंडी उडाली आहे. इथं ना कराडची दहशत आहे ना राजकीय नेत्याचा दबदबा. इथं सध्या दहशत आहे ती बिबट्याची.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात साकुड शिवारात सध्या बिबट्याच्या दर्शनानं ग्रामस्थाची घाबरगुंडी उडाली आहे. कारणंही तसंच आहे म्हणा कारण हा असा परिसर ज्या ठिकाणी एमएससीबीमार्फत १० दिवस कधी दिवसा वीज गायब तर १० दिवस कधी रात्री बत्ती गुल असते. त्यातच आता बिबट्याचा संचार असताना रब्बी पिकांना पाणी देण्याकरता शेत शिवारात जावं तरी कसं हा यक्ष प्रश्न सध्या बळीराजाला भेडसावत आहे.
वन विभागाचा अजब सल्ला
भंबावलेल्या या बळीराजानं मार्ग काढण्यासाठी वनविभागाच कार्यलया गाठलं तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुचवलेला उपाय म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असाच म्हणावा लागेल. बिबट्याला पकडतो. पिंजरे लावतो. वीज रात्रीही देतो हे सारं न सांगता. थेट गळ्याला रात्री गमछा बांधून फिरा असा अजब सल्लाच वनअधिकाऱ्यांनी दिल्यानं अवघं गावं गळ्याला गमछा बांधून फिरत आहे. त्यामुळे या बिबट्याबरोबर गमछाचाही भाव वाढला आहे. त्यामुळे थंडीत या गावात कानाची मफलर गळ्यात भोवती आली आहे.