अनंत गर्जे प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सखोल सुनावणी पार पडली. पोलिस, गौरी गर्जे यांच्या वकील सुबीर सरकार आणि आरोपी अनंत गर्जे यांच्या वकील मंगेश देशमुख यांनी युक्तिवाद केला. या वेळी पोलिसांनी अनंत यांच्या २० मिनिटांच्या ऑडिओ क्लिपसह महत्त्वाचे पुरावे न्यायमूर्तींसमोर सादर केले, ज्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
पोलिसांनी सांगितले की, ही ऑडिओ क्लिप अनंत गर्जे यांनीच रेकॉर्ड केली असून, त्यात त्याने गौरीला मारहाण केल्याचे मान्य केले आहे. याशिवाय, क्लिपमध्ये अनंत गर्जे गौरीला पुरेसा वेळ देत नसल्याचे संभाषण समोर आले आहे. तसेच, तो सातत्याने गौरीवर जुन्या प्रेमप्रकरणाबाबत घरच्यांना सांगितल्यास आत्महत्या करेन अशी धमकी देऊन दडपण टाकत असल्याचेही पुराव्यातून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी गौरीने तिच्या मैत्रिणीला पाठवलेल्या व्हिडिओ क्लिप देखील महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. या पुराव्यांमुळे प्रकरण मजबूत झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, अनंत गर्जे यांना नार्कोटेस्ट करण्याबाबत विचारले असता ते तयार नसून, तपासाला सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात नोंदवले.