सत्ताधाऱ्यांचा सध्याचा बहुप्रतिक्षित मुद्दा म्हणजे खातेवाटप होय. मंत्रिमंडळ विस्तारात शपथविधी झाल्यानंतर तिन्ही पक्षांच्या 39 मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालं. मात्र, खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच चिमटे काढले होते. मात्र आता खातेवाटप ठरल्याची माहिती मिळत आहे.
भाजप आणि शिवसेनेनं यादी तयार केली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीमुळे खाते वाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यादी सादर झाल्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांसमोर यादी सादर करू शकतात. खाते वाटपातही भाजपला मोठ्या भावाच्या भूमिकेत गृहनिर्माणसारखं महत्त्वाचं खातं सोडावं लागल्याची माहिती आहे. तर शिवसेनेला नगरविकास विभाग, आणि राष्ट्रवादीला अर्थ खातं स्वतः कडे ठेवण्यात यश आल्याचंही कळतंय. दरम्यान काही संभाव्य खातेवाटपाची यादी आता समोर येताना दिसतेय.