इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला असून कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी संपलेली आहे. तर कोरटकरच्या जामीन अर्जावर येत्या 9 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय देणार आहे. तर इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकर हा जेलमध्येच सुरक्षित असल्याचा युक्तिवाद केला.
तर प्रशांत कोरटकर यांचे वकील सौरभ धाग यांनी कोरटकरला झालेली अटक बेकायदेशीर असून त्यांचा जामीन मंजूर करावा अशी विनंती न्यायालयाकडे केली. दरम्यान न्यायालयाने तिघांचेही युक्तिवाद ऐकून घेत 9 एप्रिल रोजी निकाल देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर याचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
असीम सरोदे काय म्हणाले?
याचपार्श्वभूमिवर असीम सरोदे म्हणाले की, "आता सुद्धा हा जो जामीन अर्ज केलेला आहे तो अत्यंत घाईने आणि जामीन मिळालाच पाहिजे असा दुराग्रह ठेवून केलेला आहे असं दिसतं आहे. कारण, तपास अजून पुर्ण झालेला नाही असं सरकार पक्षातर्फे सांगण्यात आलेलं आहे. त्याचसोबत पोलिसांनी देखील लेखी स्वरुपात याची माहिती दिली आहे. कारण प्रशांत कोरटर ज्या राज्यात लपुन बसला होता, त्यावेळी त्याला ज्या लोकांनी मदत केली त्यांच स्टेटमेंट घेण गरजेच आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकरला तपास पुर्ण होण्याआधी जामीन देण हे काही योग्य नाही, असं मला वाटत". असं स्पष्टीकरण इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी दिलं आहे.