विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपले मुद्दे मांडले आहेत. यामध्ये पाण्याच्या मुद्दावरुन आव्हाडांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावले आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "ठाणे महानगरपालिकेत १० ऐवजी ३ कर्मचारी काम करत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांसोबत आमचे वाद होतात. मुंब्रामध्ये अस्वच्छ पाणी येते आहे. आधीच भारतामध्ये रोगराई पसरत असल्याने या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टाक्या बसवणार होते. कधी बसवणार? त्यांनी एखादा अहवाल दाखल करावा की प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आलं आहे."
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मागच्या अधिवेशात प्रकाश महाजन यांनी माझी टिंगल केली होती की, भीक मागावी लागते. माझी सभागृहाला विनंती आहे की, शक्य होत असेल तर त्यांनी आताच १० एमआडी पाणी मुंब्राला वाढवून द्यावे. अनेकवेळा पालिकेच्या आयुक्तांना आम्ही सांगत असतो की, अनाधिकृत पाणी जोडणी करत असलेल्या व्यक्तीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई केली पाहिजे. एखादा २-३ जण तुरुंगात जाऊन आले की, त्यांना समज बसेल. पाण्याच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. जगातील पहिली लढाई जी गौतम बुद्धांना पाण्यावरुन करावी लागली होती. शेवटचे महायुद्ध हे पाण्यावरुन होईल. या पाण्यावरुन कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट सगळीकडे लढाया सुरु आहेत." असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे.