कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यातच राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे 50 पेक्षा अधिक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद केली असून 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर अनेक जणांना स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे.